मान्सून 2026 चा अंदाज ; दुष्काळ की सुकाळ, पहा तोडकर यांचा अंदाज
२०२६ च्या पावसाळ्याबद्दल (मान्सून) विचार केला असता, यंदा दुष्काळ पडण्याची शक्यता कमी आहे. ‘ला निना’ स्थिती न्यूट्रलमध्ये जात असली तरी ‘अल निनो’चे संकट सध्यातरी दिसत नाही, त्यामुळे पाऊस सरासरी इतका राहू शकतो. जून आणि जुलै महिन्यात पेरणीसाठी पावसाचा काहीसा लपंडाव किंवा ओढ जाणवू शकते. ऑगस्ट महिन्यात पावसाचा सुमारे २० ते २५ दिवसांचा मोठा खंड पडण्याची शक्यता असली, तरी एकूण पावसाचे प्रमाण पिकांसाठी पुरेसे राहील. विशेष म्हणजे, यंदा परतीचा पाऊस अत्यंत समाधानकारक आणि जोरदार असेल, जो रब्बी हंगामासाठी आणि भूगर्भातील पाणीपातळी वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.
एकूणच, २०२६ हे वर्ष दुष्काळी नसून एक “सुकाळ” किंवा सरासरी पावसाचे वर्ष असेल. मान्सूनचे आगमन काहीसे लांबणीवर पडू शकते किंवा सुरुवातीला पावसाची टक्केवारी कमी राहू शकते, परंतु परतीचा पाऊस या कसर भरून काढेल. शेतकऱ्यांनी हवामानातील बदलांनुसार आपल्या पिकांचे व्यवस्थापन करावे. हा अंदाज सध्याच्या हवामान मॉडेलवर आधारित असून, मान्सूनच्या अधिक अचूक माहितीसाठी मार्चमध्ये येणारा पुढील रिपोर्ट महत्त्वाचा ठरेल.
जानेवारी महिन्यात कडाक्याची थंडी असली तरी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ती हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल, मात्र जानेवारीच्या सुरुवातीला सकाळची हुडहुडी कायम राहील. जानेवारी महिन्यात अवकाळी पावसाची मोठी शक्यता नसून ७ आणि २६ जानेवारीच्या सुमारास काही ठिकाणी केवळ ढगाळ वातावरण राहू शकते. फेब्रुवारी महिन्यात तापमानात वाढ होण्यास सुरुवात होईल, विशेषतः खानदेश, विदर्भ आणि मराठवाड्यात उन्हाचा चटका अधिक जाणवेल. या काळात कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रातील सांगली, सातारा यांसारख्या भागात तुरळक पावसाच्या सरींची शक्यता नाकारता येत नाही.
मार्च आणि एप्रिल महिन्यांत हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता असून हे महिने वादळी वाऱ्याचे राहू शकतात. मार्चच्या दुसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात (विशेषतः ११ आणि २४-२६ तारखेच्या दरम्यान) पावसाचा धोका असल्याने शेतकऱ्यांनी गहू, हरभरा यांसारख्या पिकांची काढणी योग्य नियोजनाने करणे आवश्यक आहे. एप्रिलमध्ये काही भागांत, विशेषतः बुलढाणा आणि आसपासच्या परिसरात किरकोळ गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा काळ शेतीसाठी थोडा आव्हानात्मक ठरू शकतो, त्यामुळे हवामानाचे अपडेट्स घेऊनच शेतीकामांचे नियोजन करणे फायदेशीर ठरेल.